नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर मोठा धक्का बसला आहे. युवक राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पाठोपाठ युवतीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर आहे. अजित पवार यांनी बंडखोरी करताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावरण्यासाठी शरद पवार यांनी दिल्लीतील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाची जबादारी सोनिया दुल्हन यांच्याकडे दिली होती. ही तरुणी राष्ट्रवादीची लेडी जेम्स बँड म्हणून ओळखली जाते. तिचे नाव आहे सोनिया दुहान. त्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.
‘लोक माझे सांगाती’ या आपल्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही सोनिया या पवार यांच्या मागे पिवळ्या कुर्तीमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती.
कोण आहे सोनिया दुहान?
सोनिया दुहान या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत. सोनिया यांनी २०१९ मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवेळी राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे काम केलं होतं. अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार नॉट रिचेबल होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१९ मध्ये बंडखोरी झाली होती. या गोष्टींशी सोनिया दूहन यांचा संबंध आहे. सोनिया दूहन यांनी २०१९ मध्ये हरियाणातील गुरुग्राममधून राष्ट्रवादीच्या आमदारांची सुटका केली आणि अजित पवार गटासह भाजपचे महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे स्वप्न मोडले होते. भाजपाच्या गळाला लागलेल्या या आमदारांना परत आणण्याचं काम अत्यंत नाट्यमय पद्धतीने सोनियांनी केलं होतं.