इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना – जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटीत येते पत्रकार परिषद घेऊन आगामी रणनिती काय असणार आहे याची माहिती दिली. यावेळी सरकारविरोधात पुढे आंदोलन काय असेल हे सुध्दा सांगितले. राज्य सरकारने २४ तारखेच्या आत आरक्षण दिले नाही तर २५ तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी या आंदोलनात कोणतेही उपचार घेणार नसून पाणीदेखील पिणार नसल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये असे आवाहन केले. त्याचप्रमाणे शांततेतील आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी त्यांनी उपोषणाची घोषणा करतांनाच २५ ऑक्टोबरपासून आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचे नाही तर आमच्या गावाची वेसही शिवू देणार नाही. राजकीय नेत्यांना म्हणजे आमदार, खासदार आणि मंत्र्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. २५ तारखेला २८ तारखेच्या आंदोलनाची दिशा सांगितली जाईल. जी दिशा सांगितली जाईल ती सरकारला पेलणार नाही असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सर्कलमधील सर्व गावांच्यावतीने एकाच ठिकाणी ताकदीने साखळी उपोषण सुरू केले जाणार आहेत. पुढे २८ ऑक्टोबरपासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार
प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, प्रचंड संख्येने समाजाने एकत्रित येऊन कँडल मार्च काढण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी कोणीही उग्र आंदोलन करायचे नाहीत. त्याला आपले समर्थन नाही. कोणीही आत्महत्या करायची नाही. हेच शांततेच आंदोलन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी आता वाटाघाटीचा प्रश्नच नसल्याचेही स्पष्ट केले.