पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पुणे कार अपघातात आजोबा सुरेंद्र अग्रवाल यालाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात सुरेंद्र आणि विशाल अग्रवाल यांनी चालक गंगाराम पुजारी याच्याकडून त्याचा मोबाईल काढून घेऊन एका खोलीत डांबून ठेवले. आम्ही सांगतो तोच जबाब पोलिसांना द्यायचा, असा दबाव बाप-बेट्यांनी आणला. हा गुन्हा अंगावर घे आम्ही तुला गिफ्ट देऊ, असे सांगून अग्रवाल यांनी चालकाला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. तो ऐकायला तयार नसल्याने अग्रवाल बाप-बेट्यांनी चालकाला धमकावले. आम्ही तुला बघून घेऊ, अशी धमकी दिली, अशी माहिती तपासात उघड झाल्यानंतर सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आली.
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती सांगितली, चालकगंगारामला घरात डांबून ठेवले. त्याचा मोबाईल फोन काढून घेतल्याने त्याचा कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नाही. नवरा घरी आला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी गंगारामची बायको नातेवाइकांना घेऊन अग्रवाल कुटुंबीयांच्या घरी आली. अग्रवाल कुटुंबीयांनी गंगारामला सोडण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या पत्नीने आरडाओरडा केला. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाने गंगारामला सोडले. घरातून पत्नीसह बाहेर पडल्यानंतर गंगाराम घाबरला. पण पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला.
सुरेंद्रकुमार अग्रवालवर अपहरण, दमदाटी आणि डांबून ठेवण्याचा गु्न्हा दाखल केला. सुरेंद्रकुमारला अटक करण्यात आली आहे. विशाल न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे त्यालाही आवश्यक ती प्रक्रिया करुन ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने चालकासह अग्रवाल याच्या घरी जाऊन पंचनामा केला. चालकाला ज्या खोलीत डांबले होते, तिची पाहणी केली. त्या वेळी चालकाने जे कपडे घातले होते, ते ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केल्याची माहिती आयुक्तांनी दिली. अग्रवाल कुटुंबीयांनी जबरदस्तीने खोलीत डांबून ठेवल्याचा चालक गंगारामला मोठा मानसिक धक्का बसल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.