इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना नेते ॲड. अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी प्रा. ज. मो. अभ्यंकर यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण, नाशिक शिक्षक मतदार संघात ठाकरे गटाने त्यांचा आमदार असतांना अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. ही उमेदवारी अद्याप प्रतिक्षेत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबई विभागात शिक्षक व पदवीधर, कोकण विभागात पदवीधर तर नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाच्या पुढे ढकललेल्या निवडणूकीचा कार्यक्रम पुन्हा काल जाहीर केला. त्यानंतर ठाकरे गटाने ही उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे.
या निवडणुकीसाठी ३१ मे रोजी अधिसूचना जारी होणार आहे. तसेच ७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १० जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तर १२ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. २६ जून रोजी सकाळी ८ ते ४ वेळेत मतदान होणार आहे. १ जूलै रोजी मतमोजणी होणार आहे. ५ जूलै पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या मतदार संघातून ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे हे निवडून गेले होते. त्यांची मुदत ७ जुलै पर्यंत आहे. या मतदार संघात ७० हजार शिक्षक मतदार आहे.