इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या सहाव्या टप्प्यातील मतदानासाठी भारतीय निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५८ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. या टप्प्यात हरियाणा आणि दिल्लीच्या एनसीटी मध्येही मतदान होणार आहे. या टप्प्यात बिहार, झारखंड, जम्मू आणि काश्मीर, ओदिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात/ केंद्रशासित प्रदेशात या टप्प्यात मतदान होणार आहे. याच्या सोबतीला, ओदिशा राज्य विधानसभेच्या ४२ विधानसभा मतदारसंघांतही मतदान होणार आहे.
हवामान विभागाने ज्या भागांसाठी उष्ण हवामान किंवा पावसाचा अंदाज वर्तवला असेल अशा भागात, संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि राज्य यंत्रणांनी प्रतिकूल परिणाम व्यवस्थापित करण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुखकर आणि सुरक्षित वातावरणात मतदान व्हावे यासाठी मतदारांना आवश्यक पुरेशी सावली, पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृहे आणि इतर मूलभूत सुविधांसह मतदान केंद्रे सज्ज आहेत. मतदान यंत्रे आणि मतदान साहित्यासह मतदान कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत.
मतदारांनी घराबाहेर पडून जबाबदारी समजून घेत, अभिमानाने तसेच मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर मतदान करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. दिल्ली, गुडगाव, फरीदाबाद सारख्या शहरी केंद्रांमधील लोकसभा मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याच्या आणि शहरी उदासीनतेच्या प्रवृत्तीला खंडित करत त्यांचे हक्क आणि कर्तव्याची विशेष आठवण करून दिली जात आहे.
शेवटचा टप्प्यात म्हणजेच मतदानाच्या ७ व्या टप्प्यात म्हणजेच १ जून रोजी उरलेल्या ५७ लोकसभा मतदारसंघात मतदान होईल तर ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यांमध्ये 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि 428 लोकसभा मतदारसंघातील मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडले.