इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
तेलअवीवः गाझामधील हमासच्या लक्ष्यांवर हल्ले करून इस्रायलला मोठा फटका बसला आहे. नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन या तीन देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता जाहीर केली आहे.
नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर म्हणाले, की दोन-देश तोडगा काढणे हे इस्रायलच्या हिताचे आहे. याचा अर्थ इस्रायललाही एक देश म्हणून मान्यता मिळावी आणि त्याचप्रमाणे गाझा पट्टी आणि वेस्ट बँक असे विभागलेले पॅलेस्टाईनही एक देश म्हणून ओळखले जावे. यामुळे वाद संपुष्टात येईल आणि पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होईल. नॉर्वेच्या पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर आता स्पेन आणि आयर्लंडनेही असेच संकेत दिले आहेत. २८ मे रोजी आम्ही पॅलेस्टाईनला मान्यता देऊ असे नॉर्वेचे पंतप्रधान म्हणाले. जर आपण पॅलेस्टाईनला मान्यता दिली नाही, तर मध्यपूर्वेत शांतता नांदणार नाही, असे ते म्हणाले.
नॉर्वेच्या घोषणेनंतर लगेचच आयर्लंडचे पंतप्रधान सायमन हॅरिस म्हणाले, की त्यांचा देश पॅलेस्टाईनलाही मान्यता देईल. आज आयर्लंड, नॉर्वे आणि स्पेनने पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. पॅलेस्टाईनला मान्यता देण्यासाठी कोणती पावले उचलली जावीत, याकडे आपण सर्वजण लक्ष घालू. ते म्हणाले, की आम्हाला विश्वास आहे, की आणखी काही देश आमच्यात सामील होतील आणि इस्रायलला मान्यता मिळेल. पुढील काही आठवड्यांतच महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी बुधवारी सांगितले, की,आमच्या मंत्रिमंडळाची बैठक २८ मे रोजी होणार आहे. या दिवशी आम्ही पॅलेस्टाईनला वेगळा देश म्हणून मान्यता देण्याचा ठराव पास करू. या देशांच्या या भूमिकेवर इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅटझ यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे राजनैतिक संबंधही बिघडले आहेत. इस्रायलला राग आला असून, त्यांनी ताबडतोब राजदूतांना परत बोलावले. इस्रायलने आयर्लंड आणि नॉर्वे येथील राजदूतांना तातडीने परतण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलने या तिन्ही देशांच्या निर्णयावर आक्षेप घेत अस्थिरता वाढण्याचा इशारा दिला आहे.