नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोवंश जनावरांची कत्तलीसाठी राजरोसपणे वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. काठे गल्ली सिग्नल भागातून पिकअप वाहनात डांबून पाच जनावरांची वाहतूक केली जात होती. पोलीसांची चाहूल लागताच चालकाने आपले वाहन सोडून पोबारा केल्याने ही कारवाई करण्यात आली असून यात दोन गाई एक बैल व दोन वासरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिगरानीया रोडवरील कत्तलखाना उध्वस्त करण्यास २४ तास उलटत नाही तोच पीकअप वाहनातून जनावरांना डांबून कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास पोलीसांनी सापळा लावला असता गोवंश जनावरांची सुटका करण्यात यश आले.
द्वारका भागातून जाणा-या पिकअप वाहनास एमएच ०५ आर ६९५७ पोलीसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने आपल्या ताब्यातील वाहन नाशिकरोडच्या दिशेने दामटले. पोलीसांनी पाठलाग केला मात्र काठेगल्ली सिन्नल भागात चालकाने वाहन थांबवून पोबारा केला. या कारवाई सुमारे चार लाख ३५ हजार रूपये किमतीच्या जनावरांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी अंमलदार अनिल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.