नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील करण हॉटेल जवळ दुचाकी अडवून भामट्यांनी ओझरच्या व्यावसायीकास लुटल्याची घटना घडली. या घटनेत धारदार शस्त्राचा धाक दाखवून भामट्यांनी हातातील सोन्याचे ब्रॅसलेट आणि अंगठी बळजबरीने काढून घेत पोबारा केला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाळ विजय लढ्ढा (रा.तानाजी चौक,ओझर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. किराणा व्यावसायीक असलेले लढ्ढा सोमवारी (दि.२०) कामानिमित्त शहरात आले होते. रात्री अकराच्या सुमारास ते दुचाकीवर परतीचा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. करण हॉटेल परिसरात दुचाकीवर पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांची वाट अडवित ही लुटमार केली.
दुचाकीस्वार टोळक्याने त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवित त्याच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठी बळजबरीने काढून घेत धुम ठोकली. अधिक तपास उपनिरीक्षक उपनिरीक्षक मनिषा शिंदे करीत आहेत.