नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा कोषागार कार्यालय, नाशिक यांच्या अधिनस्त सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांना विविध प्रकारचे लाभ प्रदान केले जातात. सदर लाभ प्रदान करतांना कोणत्याही प्रकरे वसुलीबाबत अथवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. कोषागार कार्यालयातून कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकाच्या घरी पाठविले जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करणेबाबत सूचितही केले जात नाही. याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. अशा तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी फसव्या फोन कॉल्सपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी महेश बच्छाव यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
सर्व निवृत्तीवेतनधारक व कार्यरत कर्मचारी यांना वरीलप्रमाणे प्रदानासंदर्भात संपर्क करून ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत दूरध्वनी/ भ्रमणध्वनीवरून आलेल्या कॉल्स किंवा संदेशास प्रतिसाद देवू नये. याबाबत निवृत्तीवेतनधाराकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती त्यांची वैयक्तिक जबाबदारी राहील. अशा प्रकारचा कोणताही दूरध्वनी अथवा कॉल आल्यास तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.