भिवंडी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भिवंडीत लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि अधिकारी, पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार रोहित पवार यांनी कालच या घटनेचा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले होते की, केंद्रीयमंत्री राहिलेले भिवंडी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या देतात. अशाप्रकारची मस्ती भाजप नेत्यांच्या अंगात येतेच कुठून, असा प्रश्न पडतो. कदाचित सागर बंगल्यावर बसलेल्या त्यांच्या बॉसचे विशेष संरक्षण असल्याने ही मस्ती येत असावी. असो, पण हा अहंकार आणि सत्तेची मस्ती चार जूनला उतरल्याशिवाय राहणार नाही!
या पोस्टनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर पोलिसांना केलेली शिवीगाळ पाटील यांच्या अंगलट आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. सरकारी कामात अडथळा तसेच अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, दादा गोसावी, भाजपचा भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटील आणि रवी सावंत या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीतील अन्सारी मैदान परिसरातील एका शाळेत बोगस मतदान होत असल्याचे समजताच पाटील तिथे पोहोचले. या वेळी त्यांनी अधिकारी आणि पोलिसांना दमदाटी आणि शिवीगाळ केली होती.