नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्टॉक मार्केट मध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील चौघांना तब्बल ५९ लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. बनावट ट्रेंडिग अॅपच्या माध्यमातून ही फसवणुक करण्यात आली असून गुंतवणुकदारांना विविध बँक खात्यात रकमा भरण्यास भाग पाडण्यात आले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील चौघा गुंतवणुकदारांशी भामट्यांनी संपर्क साधला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळया भागात राहणा-या गुंतवणुकदारांशी संपर्क साधून भामट्यांनी स्टॉक मार्केट कंपनीचे ब्रोकर असल्याचे भासवून हा गंडा घातला. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास अल्पावधीत जादा परताव्याचे आमिष दाखविल्याने चौघे गुंतवणुकदार भामट्यांच्या गळाला लागले.
बनावट ट्रेंडीग अॅपच्या माध्यमातून ही फसवणुक झाली. दि. १८ ऑक्टोबर ते २४ एप्रिल दरम्यान गुंतवणुकदारांना विविध खात्यात ऑनलाईन पैसे वर्ग करण्यास भाग पाडण्यात आले. चौघा गुंतवणुकदारांनी ५८ लाख ३३ हजार ९२४ रूपयांची गुंतवणुक करूनही मुद्दलसह परतावा पदरी न पडल्याने गुंतवणुकदारानी भामट्यांशी संपर्क केला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे भेदरलेल्या गुंतवणुकदारांनी पोलसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.