नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फुलनेगर येथील तेलंगवाडीत घरात शिरून एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. गेल्या तीन वर्षापासून संशयित मुलाचा पाठलाग करीत त्रास देत असल्याने तिने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित ज्ञानेश्वर पवार (रा.तेलंगवाडी,फुलेनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित व पीडिता एकाच भागात वास्तव्यास आहे. गेल्या तीन वर्षापासून संशयिताने पाठलाग करीत तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी (दि.१५) घरात एकटी असतांना संशयिताने अतिरेक केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला.
मुलगी एकटी असल्याची संधी साधत घरात शिरलेल्या संशयिताने तिचा विनयभंग केला. मुलीने आपल्या बचावासाठी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ व दमदाटी करीत धमकाविल्याने मुलीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.