इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
चंदीगडःमाजी खासदार कैलाशो सैनी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. याआधी हरियाणातील तीन अपक्ष आमदारांनी भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. आता भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कुरुक्षेत्रचे माजी खासदार कैलाशो सैनी यांनी माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
कैलाशो हे कुरुक्षेत्र जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेते मानले जातात. लोकसभा निवडणुकीत कुरुक्षेत्रात ‘इंडिया’आघाडीचे आम आदमी पक्षाचे उमेदवार सुशील गुप्ता यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सैनी हे दोनदा खासदार होते. कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून १९९८ आणि १९९९ मध्ये हरियाणा लोक दल (राष्ट्रीय) आणि भारतीय राष्ट्रीय लोक दलाच्या तिकिटांवर ते निवडून आले होते. कुरुक्षेत्र जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष होते.
या प्रवेशानंतर माजी मुख्यमंत्री हुड्डा म्हणाले, “हरियाणामध्ये सुमारे ४० माजी आमदार आणि खासदार आधीच काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. याशिवाय नुकत्याच तीन अपक्ष आमदारांनी पक्षाला पाठिंबा दिला होता. हरियाणातील भाजप सरकार अल्पमतात असून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा. आम्ही राज्यपालांना निवेदन देऊन विधानसभा विसर्जित करून विधानसभा निवडणुका घेण्याची विनंती केली आहे. सैनी हे जवळपास तीन दशकांपासून कुरुक्षेत्राच्या राजकारणात सक्रिय आहेत.