इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. पुढील वर्षी ती जपानला मागे टाकेल, असे नीती आयोगाचे माजी ‘सीईओ’ अमिताभ कांत यांनी म्हटले आहे.
सध्या भारत ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपानच्या अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठ्या आहेत. कांत यांनी ‘सोशल मीडिया’ साइटवर लिहिले, की भारत पुढील वर्षी चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि जपानला मागे टाकेल. मी २०१३ च्या कमकुवत ५ अर्थव्यवस्था ते २०२४ च्या मजबूत ५ अर्थव्यवस्थांपर्यंतच्या प्रवासाची काही झलक सादर करत आहे, ज्यात २.१ लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल, गेल्या तीन तिमाहीत आठ टक्क्यांची वाढ, २७ देशांसोबत भारतीय चलन रुपयामध्ये, व्यापार, पोलाद, सिमेंट आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील दुहेरी अंकी वाढ, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये जगाचे नेतृत्व अशा घटनांचा त्यांनी उल्लेख केला.
आपल्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होईल याची हमी मोदी आपल्या भाषणातून सतत देत असतात. बीबीसीच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये असा अंदाज वर्तवला होता, की भारत २०२७-२८ या वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. आता कांत यांचे विधानही या भाकिताचा एक भाग मानता येईल, की भारताची अर्थव्यवस्था झपाट्याने वाढेल. भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाचीही होईल; परंतु दरडोई उपन्न वाढल्याशिवाय अर्थव्यवस्थेचा नुसता आकार वाढूनही उपयोग नाही. भारताचे दरडोई उत्पन्न दक्षिण आशियायी देशांच्या तसेच आफ्रिकन देशांच्या उत्पन्नापेक्षाही कमी आहे.