इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यात भेट झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंबेडकर यांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून आणली आहे. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आणि महाविकास आघाडीत येण्याची शक्यता असल्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाला १०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील एका परिसंवादात पवार, आंबेडकर यांच्यासह खा सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर हे होते. यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पाचव्या मजल्यावर ही भेट झाली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात असले तरी प्रकाश आंबेडकर यांनी मात्र त्याचे खंडण केले. ते म्हणाले, भेट झाली पण, चर्चा काही झाली नाही. यावेळेस १२ जण होते त्यामुळे चहाच आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे इंडिया आघाडीबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले तूर्त हा विषय आता होणार नाही. पाच राज्याच्या निवडणूका सुरु आहे. त्यानंतर त्यावर चर्चा होईल. विशेष म्हणजे या भेटीमुळे फारशी चर्चा झाली नसली तरी या भेटीने आंबेडकर आणि पवार यांच्यातील कटुता दूर झाली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.