नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्र्याचे शेड उभारण्याच्या बहाण्याने एका ठेकेदाराने वृध्दास लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. इसारची रक्कम वर्षभरापूर्वी स्विकारूनही शेड न उभारल्याने वृध्दाने पैश्यांची मागणी केली असता संशयिताने टोलवाटोलवी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश काळे (रा. कसबे सुकेणे ता.निफाड) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठेकेदाराचे नाव आहे. याबाबत भिला शंकर देवरे (६० रा.जगन्नाथ लॉन्स जवळ,म्हसरूळ आडगाव लिंकरोड) यांनी फिर्याद दिली आहे. देवरे यांचा राहत्या प्लॉट न.२५ यावर पत्र्याचे शेड उभारायचे असल्याने त्यांनी गेल्या ३० एप्रिल रोजी संशयित ठेकेदाराची भेट घेतली होती.
यावेळी पत्र्याचे शेड उभारण्याच्या मोबदल्यात इसार म्हणू एक लाख रूपयांची रोकड देण्यात आली होती. मात्र वर्ष उलटूनही संशयिताने कामास प्रारंभ केला नाही. त्यामुळे देवरे यांनी संशयिताशी संपर्क साधत पैश्यांची मागणी केली असता संशयिताने टोलवा टोलवी करीत त्यांच्याशी आरेरावीची भाषा वापरून दमदाटी केली. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच वृध्द देवरे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.