इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळे मोदी समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्था आहे. मोदींना मत द्यायचे आहे, पण, कमळ नाही अशा प्रतिक्रिया आता समोर येत आहे. त्यातच गेल्या वेळी आम्ही शिवसेनेला मतदान केले, पण, त्यानंतर अडीच वर्षे ते खासदार मोदी विरोधात होते. त्यामुळे मनाला खूप त्रास झाला. आता पुढे यांना मत दिले तर ते मोदींबरोबर राहतील का? असा प्रश्न मनाला सतावतो. त्यामुळे मोदींसाठी मतदान करायचे आहे, पण, हेच विरोधात गेले तर त्याची काय गॅरंटी. त्यामुळे यावेळेस हिंदुत्वाला पुढे नेणारे दोन उमेदवार उभे आहे. त्यांना आम्ही मतदान करु असे सांगत एका भाजप समर्थक मतदाराने आपले मत व्यक्त केले.
नाशिक लोकसभा मतदार संघ भाजपला सोडावा यासाठी जोरदार प्रयत्न झाले. त्यावेळेस विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना प्रचंड विरोध झाला. भाजपच्या सर्व्हेमध्ये खासदारांविषयी पॅाझिटिव्ह मत नव्हते. त्यामुळे भाजपने या सर्व गोष्टी पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकल्या. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे छगन भुजबळांचे नाव थेट दिल्लीतून आल्यामुळे भाजपने नरमाईची भूमिका घेतली. पण, भुजबळांनी माघार घेतल्यानंतर हा मतदार संघ भाजपला सुटेल या आशेवर भाजप होते. पण, अखेर शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटली व उमेदवारही बदलला नाही. त्यामुळे भाजपमध्ये आजही खदखद आहे. त्यातच बहुतांश भाजप समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. एकीकडे मोदीला मत द्यायचे आहे, तर दुसरीकडे उमेदवाराविषयी नाराजी आहे.
एकुणच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्यासाठी महायुतीचे घटक पक्ष भाजप, राष्ट्रवादी अजित पवार, मनसे व रिपाइं आठवले गट एकत्र आले असले तरी मतदार अजूनही संभ्रमात आहे. त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहे. भाजप समर्थक मतदारांची यासारखीच वेगवेगळी मते आहे. मोदींना मतदान द्यायचे असले तरी उमेदवार कोणी दिला तर कसं चालेल असा प्रश्नही आहे. त्यामुळे आता धडा शिकवला तर पुढे उमेदवार देतांना विचार केला जाईल असाही मतप्रवाह आहे. तर काहींच्या मते उमेदवार कोणीही असो, मोदींनाच मतदान करायचे आहे असेही काहींनी सांगितले. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांबाबत समीश्र प्रतिक्रिया आता समोर येत आहे.