नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परिक्षेत जिल्ह्यातील 24 हजार 982 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) प्रकाश अहिरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामधील 2 हजार 686 केंद्रावर 8 हजार 332 पुरूष व 16 हजार 650 स्त्री असाक्षर परीक्षार्थींनी 17 मार्च रोजी परीक्षा दिली होती. यामध्ये एकूण 24 हजार 982 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून 233 परीक्षार्थींना सुधारणा आवश्यक म्हणून घोषित करण्यात आले आहे. उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम नियामक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी व कार्यकारी समितीचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे ही श्री. अहिरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.