इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : आर्थिक फसवणूक करणाऱ्या सोंटू जैन प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात सोंटू जैनच्या मित्राकडे आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकली असता त्याच्याकडे घबाड सापडले आहे. गोंदिया येथील डायमंड एक्सचेंज गेमिंग अप्लिकेशनमार्फत लोकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा सट्टाकिंग सोंटू नवतरन जैन याने आपल्या तिजोरीतील रक्कम आपल्या मित्र मंडळी व ओळखीच्या लोकांकडे सोडल्याने सोंटूचा मित्र राजेंद्र बग्गा यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेने छापे घालून पाच थैली रोकड व सोन्याची बिस्किटे ताब्यात घेतली आहेत.
ही कारवाई आज शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेने पाच थैले पैसे व सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. दरम्यान, कारवाई सुरू असतांनाच लाईट गेल्याने एकूण किती मालमत्ता सापडली याचा हिशेब आताच लागला नसून सध्या तपास सुरू आहे. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली सोंटूने नागपुरातील व्यापाऱ्याला ५८ कोटींचा गंडा घातला. व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सोंटू दुबईला पसार झाला. २२ जुलैला पोलिसांनी सोंटूच्या गोंदियातील निवासस्थानी छापा टाकून १७ कोटींची रोख १४ किलो सोने व २९४ किलो चांदी जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या चार बँक लॉकरची झडती घेतली. लॉकरमधूनही पोलिसांनी ८५ लाख व साडेचार कोटींचे सोने जप्त केले.
काही दिवसांपूर्वी केले आत्मसमर्पण
सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर सोंटूने वकिलामार्फत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतला. उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर सोंटूने सर्वोच्च न्यायालयान जामिनासाठी अर्ज दाखल केला. ९ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा जामीन फेटाळत सात दिवसांत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन नाकारल्यानंतर त्याच्यासमोर हाच पर्याय शिल्लक राहिला होता. १६ ऑक्टोबरला त्याने प्रथम श्रेणी कनिष्ठ न्यायालयासमोर शरणागती पत्करली.