त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -येथे मागील शेकडो वर्षांपासूनची ग्रामदेवता महादेवीच्या नावाने सुरु केलेली गाव जेवणाची परंपरा आहे. लोकवर्गणीतून जमा झालेल्या शिद्यातून विशिष्ट जातीतील व्यक्तींसाठी वेगळा स्वयंपाक करण्याची व जेवणासाठी त्यांची वेगळी पंगत बसण्याची परंपरा महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नातून बंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या कुप्रथेविरोधात पुकारलेल्या लढ्याला मोठे यश प्राप्त झालेले आहे.
त्र्यंबकेश्वरमधील महादेवी ट्रस्ट कडून लोक वर्गणी जमा केली जाते. त्यातून ह्या गावजेवणाचे आयोजन केले जाते.त्याला प्रयोजन म्हणतात . त्यामध्ये साधारण दहा हजाराहून अधिक लोक जेवण करतात. मात्र गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच खरेदी केलेल्या शिद्यातून वेगळे शिजवले जाते व या विशिष्ट समाजाची भोजनाची पंगत इतर बहुजन समाजबांधवापासून वेगळी बसण्याची पद्धत होती. ही बाब मागील वर्षी अंनिसच्या नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या कार्यकर्त्यांना कळाली. त्यावेळी तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन ही पंगती भेदाची कुप्रथा थांबविण्यात आली होती.
ह्या वर्षीची गावपंगत शुक्रवार ३ मे २०२४ रोजी होणार असल्याचे समजले होते. त्यात जातीनिहाय वेगवेगळ्या पंगती बसविणार असल्याची चर्चा सुरु झाली.लोकांच्या इच्छेने गावजेवण होत असेल तर त्याला विरोध न करता, ह्या जेवणाचा आनंद घेण्यासाठी येणारे सर्व गावकरी हे एकाच ठिकाणी शिजवलेल्या आणि एकाच पंगतीत वाटप होत असलेल्या अन्नाचा लाभ घेतील,ही भूमिका अंनिसने घेतली. त्याआशयाचे निवेदन तहसिलदार त्र्यंबकेश्वर श्वेता संचेती व पोलिस निरीक्षक त्र्यंबकेश्वर बिपीन शेवाळे यांना काही दिवस अगोदरच दिले होते. त्यांच्याशी ह्या पंगतीभेदाबाबत सविस्तर चर्चाही केली. गावजेवणात एका विशिष्ट समाजासाठी वेगळ्या ठिकाणी अन्न शिजवणे व त्यांची वेगळी पंगत बसविणे,ही अनिष्ट, अमानवीय ,राज्य घटनेशी विसंगत असून, सामाजिक विषमतेला बळ देणारी बाब आहे, हे तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना तोंडी तसेच लेखी निवेदनातून अंनिसचे राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे,राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, कार्याध्यक्ष त्र्यंबकेश्वर
संजय हरळे ,दिलीप काळे यांनी स्पष्ट केले.तहसिलदारांनी संबंधित ट्रस्टींना बोलावून घेतले. कायदेशीर समज देऊन ट्रस्टींना तशा आशयाचे पत्र दिले. पोलिस प्रमुखांनीही कायद्याचे पालन करून, एकोप्याने राहून, सर्वांनी एकाच पंगतीत भोजनाचा आनंद घ्यावा, ह्या अंनिसच्या विचाराला पाठिंबा दिला.
त्यानंतर ट्रस्टींनीही योग्य तो निर्णय घेऊन ,सर्वांनी एकच पंगतीत भोजन घेण्यासाठी ठरविले. त्यामुळे वर्षानुवर्षं चालत आलेली विशिष्ट समाजाची वेगळी पंगत बसण्याची प्रथा ह्या सर्वांच्या प्रयत्नातून संपुष्टात आली. पुढाकार जरी महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतला तरी त्यासाठी तहसिलदार, पोलिस निरीक्षक व त्यांचे सहकारी, महादेवी ट्रस्ट ,गावकरी यांनी मोठे धाडस दाखवले आहे. ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही कारणास्तव माणसामाणसात भेद केला जात असेल तो सूज्ञांनी पुढे होऊन थांबविला पाहिजे, असे आवाहन यावेळी अंनिसच्या वतीने करण्यात आले.
आम्ही याविरोधात लढलो.
खरे तर ही कुप्रथा मागील वर्षीच थांबविण्यात आली होती. परंतु या वर्षी वेगवेगळ्या पंगती बसणार असल्याची चर्चा कानावर आल्याने, अंनिसच्या जिल्हा व राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही याविरोधात लढलो. त्यातून हे सामाजिक परिवर्तन झाले आहे.अंनिस याचे स्वागत करत आहे.
-संजय हराळे,
कार्याध्यक्ष, अंनिस ,त्र्यंबकेश्वर