इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ड्रग्ज माफियाकडून एका आमदाराला १६ लाख हप्ता मिळत होता असे सहा आमदार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये केला. याबाबत सर्व माहिती पोलिसांनी असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये आज ड्रग्ज विरोधात ठाकरे गटाचा मोर्चा आहे. या मोर्चाला सुरवात होण्याअगोदर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, काल जे लोक पकडले ते मोहरे आहे. याचे मालेगाव, नांदगाव पर्यंत धागेदोरे आहेत. ललित पाटील मित्र आणि परिवार विधानसभेपर्यंत आहे. या रॅकेट मध्ये आमदार सहभागी, मंत्री आणि पोलिसांवर सुद्धा आरोप आहे. हप्त्याची आकडेवारी मला पोलिसांच्या सूत्रांनी दिली. आत्ता पान टपरी जे कारवाई झाली तिथून हप्ते जात होते. ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे नांदगाव, मालेगाव बरोबरच इंदोर आणि गुजरात पर्यंत आहे. तर गुजरातचे धागेदोरे अफगाणिस्तान पर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी शहाणपण करू नये त्यांना फस्ट्रेशन आले आहे. त्यांचे हावभाव मला समजतात ते नकली आहे. कधी आम्ही मित्र होतो. अशा विषयात बोलू नका, खांदे उडवू नका. हे सगळे काही साव आहे का ? ललित पाटील हे हिमनगाचे टोक आहे, फडणवीस गुजरातची पॉलिसी राबवत आहे. आता जे ड्रग्ज पकडले ते सगळ्या महाराष्ट्रात गेले आहे. आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही घाबरत नाही, आम्हाला महाराष्ट्र वाचायचा असे त्यांनी सांगितले. हप्त्याबाबत बोलतांना ते म्हणाले, गृहमंत्री यांना माहिती नाही का ? आयुक्त, महासंचालक आणि आयजी यांना माहिती नाही का ? असे सांगत त्यांनी या पैशावर सरकारचा एक मोठा गट पोसला जातो असा आरोप केला.
यावेळी त्यांनी सांगितले, आमचा मोर्चा ड्रग्जच्या रॅकेट विरोधात आणि सामाजिक हितासाठी आहे. या मोर्चाकडे राजकीय कारणाने नाही तर सामाजिक कारणाने बघावे. नाशिक तीर्थक्षेत्र आहे. येथे गल्ली गल्लीत पान टपरीवर ड्रग्ज पोहचले असेल तर आम्हाला आवाज उठवावा लागेल. त्यासाठी हा मोर्चा आहे. या मोर्चात विद्यार्थी आणि पालकांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही केले. पण शिक्षणाधिकारी यांनी पत्रक काढत विद्यार्थ्यांनी सहभागी होऊ नये असे आदेश दिले. त्यांचे ड्रग्जला समर्थन आहे का ? असा प्रश्नही त्यांनी केला. यावेळी त्यांनी निलम गो-हे यांच्यावरही टीका केली.तर सुषमा अंधारे यांना दिल्या जाणा-या धमक्यावरही त्यांनी उत्तर दिले.