इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महामहीम महमूद अब्बास यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. गाझामधील अल् अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले. भारत आणि या प्रदेशादरम्यान असलेले अतिशय घनिष्ठ आणि ऐतिहासिक संबंध अधोरेखित करत पंतप्रधानांनी या प्रदेशातील दहशतवाद, हिंसाचार आणि खालावत चाललेल्या सुरक्षाविषयक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्यावर भारताच्या प्रदीर्घ काळापासूनच्या आणि सैद्धांतिक भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या परिस्थितीबाबतचा त्यांचा दृष्टीकोन पंतप्रधानांना सांगितला. त्यांनी भारताच्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आणि भारताच्या भूमिकेची प्रशंसा केली.
भारताकडून पॅलेस्टिनी जनतेसाठी मानवतावादी मदत पाठवणे सुरुच राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती व्यक्त केली.