नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २०२२ -२३ मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून सुपर ५० हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील ५० विद्यार्थी व विद्यार्थिनींची परीक्षेद्वारे निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई व जेईई ॲडव्हान्स या परीक्षांसाठी निवासीस्वरूपाचे प्रशिक्षण देण्यात आले. २ वर्षांच्या कठोर परिश्रमातून २२ विद्यार्थ्यांनी जेईई main परीक्षा उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. यामध्ये १२ विद्यार्थी व १० विद्यार्थिनींचा समावेश आहे. सुपर ५० उपक्रमांतर्गत निवड झालेल्य अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांमधून वृशाली जनार्दन वाघमारे ही विद्यार्थिनी प्रथम आली आहे. तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून डिंपल अशोक बागूल ही विद्यार्थिनी प्रथम आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्चशिक्षणाविषयी प्रचंड इच्छाशक्ति असते, आर्थिक अडचण आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळत नाही, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी, स्पर्धा परीक्षांसाठी या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सुपर ५० उपक्रम हा सुरू करण्यात आला होता, यामध्ये विद्यार्थ्यांना सीईटी, जेईई व जेईई एडवान्स या परीक्षांसाठी मार्गदर्शन देण्यात येत होते. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्यामुळे सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले जात आहे. जून महिन्यात जेईई एडवान्स परीक्षेसाठी हे विद्यार्थी आता प्रविष्ट होणार आहेत.
खाजगी क्लास लावणे शक्य नव्हते
माझे आई वडील हे शेतकरी आहेत त्यामुळे नाशिक शहरात येऊन खाजगी क्लास लावणे मला शक्य नव्हते, सुपर ५० उपक्रमात माझी निवड झाल्यामुळे मला जेईई परीक्षेसाठी मला तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले, सीईओ मॅडम यांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले, अजून अभ्यास करून आता जेईई एडवान्स परीक्षेत यश मिळवायचे आहे._
डिंपल अशोक बागूल, विद्यार्थिनी
सुपर ५० उपक्रमात निवड झाल्यामुळे यश
सुपर ५० उपक्रमात निवड झाल्यामुळे मला जेईई परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळाले, त्यामुळेच मी जेईई main परीक्षा उत्तीर्ण झाले. आयआयटीत प्रवेश मिळवण्यासाठी आता मी जेईई एडवान्स परीक्षेचा अभ्यास करत आहे.
वृशाली जनार्दन वाघमारे, विद्यार्थिनी
विद्यार्थ्यांचे अभिनंदन
सुपर ५० उपक्रम २०२२-२३ अंतर्गत जेईई main परीक्षेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते, जसे जेईई main परीक्षेत यश संपादन केले तसेच आता विद्यार्थ्यांनी जेईई एडवान्स परीक्षेत देखील यश मिळवण्यासाठी शुभेच्छा देते.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक.