धाराशीव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– देशामध्ये बेकारीबद्दलची काय स्थिती? जगामध्ये एक संघटना आहे तिचं नाव आय. एल. ओ. (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन) वेगवेगळ्या तरुणांच्या आणि संपूर्ण जगातला ते अभ्यास करतात. त्यांनी असा अहवाल दिला की हिंदुस्थानामध्ये १०० मुलं जर घेतली तर त्यातील ८७ मुलं हे बेकार आहेत. ८७ टक्के तरुणांमध्ये आज बेकारी आहे आणि त्यांना १०० टक्के रोजगार द्यायचा शब्द मोदी साहेबांनी दिला होता, त्यात काही त्यांनी केलं नाही. मग केलं काय त्यांनी? अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजप सरकारवर टीका केली.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तुळजापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवन राजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी महागाईचा मुद्दा उपस्थितीत करत म्हणाले की, अनेकांच्या घरांमध्ये आज गॅसचे सिलेंडर आहे, काय किंमत होती? मोदींनी २०१४ ला घरगुती गॅसच्या संबंधीची किंमत ५० टक्के कमी करण्याचं कबूल केलं. त्यावेळेला दर होतं ४३० रुपये एका सिलेंडरला आणि आज तो झाला १ हजार १६७ हा त्यांचा हिशोब. सिलेंडरचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले, सामान्य माणसाचे संसार आणि घर चालवणे दिवसेंदिवस अवघड होत चालले.
यावेळी शरद पवार म्हणाले की मी साताऱ्याला गेलो, पुण्याला गेलो, सोलापूर जिल्ह्यात गेलो, जळगाव जिल्ह्यात गेलो, नाशिक जिल्ह्यात गेलो, अहमदनगर जिल्ह्यात गेलो, जालन्यामध्ये गेलो, औरंगाबादला गेलो, परभणीला गेलो आणि आज धाराशिवमध्ये उभा आहे. त्यामुळे एक गोष्ट झाली की सारखं सारखं बोलून माझा घसा बसला. पण घसा बसो किंवा आणखी काही होवो, आज देशासमोरची जी स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही आणि मी जागे झालो नाही तर अनेक संकटांना अनेक वर्ष तोंड द्यावे लागेल आणि म्हणून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचे नक्की राजकारण, प्रशासन काय आहे? हे तुम्हाला सांगावं या हेतूने मी आता उभा आहे.
आपला देश हा सामान्य लोकांचा देश आहे. लोकांच्या समोर काय संकट आहे? खेड्यापाड्यातील माणूस असो, शहरातील मध्यमवर्गीय असो त्याला विचारलं की तुझ्या पुढची अडचण काय? पहिलं उत्तर येतं, महागाईने त्रासून गेलोय. राज्यकर्ते कोण आहेत? आणि त्यांचे आश्वासन काय होते? हे राज्यकर्ते २०१४ साली सत्तेवर आले. २०१४ ला मत मागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की पेट्रोलचे दर ५० टक्क्यांनी ५० दिवसांमध्ये मी कमी करतो. आज काय झालं? जेव्हा सांगितलं त्यावेळेला पेट्रोलचे दर होते ७१ रुपये ते ७१ रुपये दर लिटरचे ५० दिवसांत कमी करणार होते. आज ३ हजार ६५० दिवस झाले, पेट्रोलचे दर खाली आले का? आज पेट्रोलचा दर एका लिटरला १०६ रुपये झाला. म्हणजे होता ७१, ५० टक्के कमी करण्याचा आश्वासन आणि आता १०६ करून टाकले. पेट्रोल वाढला तर प्रवास महागात पडतो, पेट्रोल वाढलं तर शेतकऱ्यांच्या शेतीचा माल विकायला न्यायचा म्हटलं तर त्याचा बोजा वाढतो. महागाईची ही झळ सामान्य माणसाला अधिक सोसावी लागते असेही त्यांनी सांगितले.