नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- त्र्यंबकरोडवर कट मारल्याची कुरापत काढून रिक्षाचालकाने बसचालकावर दगड फेकून मारल्याची घटना घडली. या घटनेत बसचालक जखमी झाला असून एस.टी.ची काच फुटल्याने नुकसान झाले आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडेराव पुंडलिक आव्हाड (रा.शिंदे ता.जि.नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. आव्हाड एस.टी.महामंडळात बस चालक म्हणून कार्यरत असून मंगळवारी (दि.२३) सायंकाळी ते नाशिक त्र्यंबकेश्वर बसवर सेवा बजावत असताना ही घटना घडली. त्र्यंबकरोडवरील आयटीआय परिसरात सिग्नल पडल्याने त्यांनी बस थांबविली असता एमएच १५ एफयू ३७६२ या अॅटोरिक्षातून आलेल्या चालकाने आपले वाहन बसला आडवे लावून, कट का मारला असा जाब विचारत आव्हाड यांना शिवीगाळ केली.
यावेळी संतप्त चालकाने खाली पडलेला दगड उचलून आव्हाड याना फेकून मारला. या घटनेत आव्हाड जखमी झाले असून एवढ्यावरच न थांबता सशयिताने दुसरा दगड उचलून फेकून मारल्याने बसची काच फुटली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे करीत आहेत.