इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमरावतीमध्ये प्रहारचे नेते आ. बच्चू कडू यांच्या प्रचारसभेसाठी अगोदर आरक्षण करूनही सायन्स कोअर मैदान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेसाठी देण्यात आले. तर दुसरीकडे रायगडमध्ये शरद पवार यांच्या सभेच्या ठिकाणापासून अवघ्या १० मीटरवर सुनील तटकरे यांच्या सभेला परवाणगी दिली. त्यामुळे येथे भरसभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची रायगड येथे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होती. या सभेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेतलेल्या होत्या. असे असतानाही पोलिसांनी ही जाहीर सभा ज्या पटांगणात होती. त्या पटांगणापासून अवघ्या १० मीटर अंतरावर दुसर्या सभेला परवानगी दिली. ही दुसरी सभा रायगडचे दुसरे उमेदवार सुनील तटकरे यांची होती.
त्यानंतर भरसभेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न विचारला की, यांना परवानगी कुणी आणि कशी दिली? एका सभेला परवानगी दिलेली असताना दुसऱ्या सभेला परवानगी देतातच कसे? आज अमरावतीमध्ये सुद्धा हाच प्रकार घडला. सभेला परवानगी दिलेली असताना ती परवानगी काढून घेण्यात आली. निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन हे दोन उमेदवारांमध्ये मारामाऱ्या व्हाव्यात, याची वाट बघतंय का? असा प्रश्न विचारुन संताप व्यक्त केला.