वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
झी मराठी वरील चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले डॉ.निलेश साबळे यांनी ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या नव्या कॉमेडी शोमध्ये धमाल उडवून टाकली आहे. यामध्ये चला हवा येऊ द्या मधील काही कलाकार दिसणार आहेत. नुकताच या शोचा प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये शोच्या पहिल्या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे.
या नवीन प्रोमोत ओंकार भोजने आणि भाऊ कदम यांच्या धम्माल विनोदावर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसताना दिसत आहे. यासोबत अभिनेता भरत जाधव आणि अलका कुबल या देखील ओंकार आणि भाऊच्या विनोदावर खळखळून हसत आहेत. या स्किट मध्ये हे दोघे ही स्त्रियांच्या वेशात दिसत आहेत. त्या दोघांच्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला भाग पाडले.नवीन प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.हसताय ना? हसायलाच पाहिजे या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळेने केले आहे.
तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीरांसोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण हे कलाकारदेखील शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. हा शो २७ एप्रिल पासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.