नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात घरफोडीच्या वेगवेगळय़ा भागात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना आर्टीलरी सेंटर भागात घडली. नायब सुबेदार सुधीर यादव (रा.क्वार्टर नं. पी १० -२ आर्टीलरी सेंटर) यांनी फिर्याद दिली आहे. यादव कुटूंबिय शनिवारी सायंकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अल्पावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या मागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ६४ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.
दुस-या घटनेत राजीवनगर येथील ऐश्वर्या जितेंद्र बुरड (रा.संभव अपा.अल्को मार्केट मागे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, बुरड कुटुंबीय गेल्या बुधवारी (दि.१७) बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात भामट्यांनी बुरड यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ३७ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.