शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करावी. त्यांच्या वक्तव्यांना मी फारसे महत्त्व देत नाही. खोटे बोल; पण रेटून बोल हा त्यांचा धंदा आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवार यांच्यावर टीकास्त्र डागले.
शुक्रवारी अहमदनगर येथे शरद पवार यांनी विखेपाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर विखेपाटील यांनी त्याला उत्तर दिले. ते म्हणाले की, अजित पवार आणि सोबतच्या लोकांच्या भूमिकेवर ते टीका करतता. पण, शरद पवारांच्या भूमिकेत कुठे सातत्य आहे. कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात. कधी भाजपला पाठिंबा देऊन तो काढून घ्यायला सांगतात. काँग्रेसमधून विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची आणि ज्यांच्याशी फारकत घेतली, त्यांच्याच पुन्हा पायाशी जाऊन बसायचे, असे सांगून ते म्हणाले, की तुम्हाला तुमच्या सोयीनुसार राजकारण करायची मुभा आहे. त्यामुळेच तुम्हाला स्वकीय सोडून गेले. आता त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात आणि अवघे दहा उमेदवार तुम्हाला देता आले.
यावेळी विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरही टीका केली. संपदा पतसंस्थेमुळे बाळासाहेब थोरात यांना वैफल्य आले आहे. पतसंस्थेच्या अध्यक्षाने १३४ कोटींचा घोटाळा केला. तो आज जेलमध्ये सुद्धा आहेत. तुमचे अनेक कार्यकर्ते जेलमध्ये जातात, याचा विचार बाळासाहेबांनी करावा. माझ्यावर आरोप करतात. त्यांच्याच नेतृत्वात एक समिती नेमून चौकशी करायला मी तयार आहे. माफियांना पाठीशी घालून आम्ही राजकारण करत नाही, अशा शब्दांत विखे थोरात यांच्यावर घणाघात केला. यावेळी ते थोराताला म्हणाले, काँग्रेसची हीच अवस्था आहे. स्वतःला नेते समजणाऱ्या थोरात यांना जिल्ह्यात एकही जागा घेता आली नाही. विखेंवर काय टीका करायची करा, मात्र तुमचे अपयश तुम्ही मान्य करा.