इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – हिंडेनबर्गने एक अहवाल सादर केला आणि त्यातून गौतम अदानी व त्यांच्या अदानी समूहाला संकटात नेऊन सोडले आहे. एखाद्यावेळी शेअर मार्केट जसे धाडकन कोसळते तशी आता अदानी समूहाची विश्वासार्हता कोसळली असल्याची चिन्हे आहेत. कारण सेबी आता प्रत्येक स्तरावर जाऊन अदानी समूहाच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे काम करत आहे.
हिंडेनबर्गने अदानींच्या विरोधात अहवाल सादर केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये त्यांचे भाव कोसळले. त्यानंतर त्यांच्या भागधारकांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यातच त्यांच्या हिमाचल प्रदेशातील इतर कंपन्यांवरही धाडी पडल्या. अशा परिस्थितीतही अदानी समूहाने स्वतःला सावरले व मार्केटमध्ये कम बॅक करण्याच्या अनेक योजना आखल्या. एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकार आणि अदानी समूहाच्या खास मैत्रीबद्दल आरोप करीत होते आणि दुसरीकडे राहुल गांधींसोबत इंडिया आघाडीत असलेले राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत गौतम अदानींच्या गुप्त भेटी सुरू होत्या. त्यामुळे एकूणच परिस्थिती संभ्रमात टाकणारी होती. अशात थोडाफार दिलासा मार्केटमध्ये कंपनीला मिळत होता. पण बाजार नियामक सेबीने तपास थांबविलेला नाही. उलट जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सेबीचे प्रयत्न सुरू आहेत.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने मुंबई विमानतळाशी संबंधित प्रकरणांमध्ये अदानी कंपनीच्या खात्यांची तपासणी सुरू केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संबंधित खात्यांची चौकशी करण्यासाठी मंत्रालयाकडून १४ ऑक्टोबरलाच नोटीस प्राप्त झाली होती. मंत्रालयाने कंपनीकडून २०१७ ते २०२२ या कालावधीतील खात्यांच्या व्यवहाराचा अहवाल मागवला आहे, असे अदानी इंटरप्रायझेसने स्वतःच स्पष्ट केले आहे. दुसरीकडे अदानी समूहाच्या अनेक सूचीबद्ध कंपन्यांसोबत गल्फ एशिया फंडाच्या संबंधांचीही चौकशी करीत आहे. या फंडाने अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याचे बोलले जात आहे.
शोध पत्रकारांची मदत
सेबीने जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यासाठी शोध पत्रकारांच्या संघटनेचीही मदत घेतली आहे. या संस्थेने अदानी समूहाबाबत अनेक रिपोर्ट्स यापूर्वी प्रसिद्ध केले असून त्यात अनेक कागदपत्रांचा दाखला देण्यात आला आहे. मात्र शोध पत्रकारांच्या संघटनेने कोणत्याही प्रकारची कागदपत्रे देण्यास सध्या नकार दिलेला आहे. ओसीसीआरपी अर्थात ऑर्गनाईझ्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट ही शोधपत्रकारांची संघटना असून त्यांनी आजवर अनेकांचे गैरव्यवहार जगापुढे उघड केले आहेत.
Gautam Adani’s foot deeper… Sebi took this big decision