नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी अवघा एक महिना बाकी असतांना सुध्दा अद्यापर्यंत महायुतीने उमेदवारी जाहीर न केल्यामुळे इच्छुक उमेदवारांचा धीर आता सुटू लागला आहे. आज तर थेट मंत्री छगन भुजबळ यांनी डेडलाईनच महायुतीला दिली आहे. त्यांनी सांगितले की, ज्यांना उमेदवारी द्यायची असेल त्यांना द्या, पण २० मे च्या आधी निर्णय घ्या. कारण, २० मे चा मुहुर्त आहे, त्यामुळे त्या आधी निर्णय झाला तर बर होईल, अशा शब्दात भुजबळांनी संताप व्यक्त केला.
आज श्रीराम नवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात महायुतीमधील विद्यमान खासदार हेमंत गोडसे व मंत्री छगन भुजबळ दोन्ही इच्छुक उमेदवार दर्शनासाठी आले होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्या पाया पडून केला नमस्कार केला. गोडसे आणि भुजबळ दोन्हीही नाशिक मधून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांच्या या भेटीची चर्चा चांगलची रंगली. यावेळी भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, कुठल्याही पक्षाला नाशिकची जागा सोडा, पण २० मे च्या आधी सोडा असे सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
२० मेला नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. त्यामुळे त्यांनी थेट २० मेच्या आत उमेदवारी घोषीत करा असे सांगून महायुतीच्या नेत्यांना एकप्रकारे दिरंगाईबद्दल नाराजीच व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, हेमंत गोडसे माझे मित्र आहेत. आज राम नवमीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आलो असता, ते पण मंदिरात आले होते. त्यावेळी, मी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे भुजबळ यांनी सांगितले.
नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीने ठाकरे गटाला जागा सोडली असून उमेदवारही घोषीत केला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी जोरदार प्रचारही सुरु केला. तरी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाही. या ठिकाणी जागा कोणत्या पक्षाला जाईल हेच कोणाला माहित नाही. महायुतीमधील तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. त्यात साताराची जागा भाजपला दिल्यानुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला नाशिकची जागा निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने या जागेवर प्रचंड ताकद लावली आहे. त्यामुळे येथील तिढा सुटत नसल्यामुळे आता इच्छुकांमधूनच नाराजीचा सूर उमटत आहे.