नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. पेठरोडवरील कर्णनगर भागात ही घरफोडी झाली. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपाली निलेश शेजवळ (रा.आई अपा. नामको हॉस्पिटल जवळ कर्णनगर,पेठरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेजवळ कुटुंबिय सोमवारी (दि.१५) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे एक लाख २४ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रविण देवरे करीत आहेत.
……..
महागडा मोबाईल लंपास केला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीबीएस बसस्थानकात बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत भामट्यांनी प्रवाश्याच्या खिशातील महागडा मोबाईल हातोहात लांबविल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे ९० हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विन दिलीप बनछोड (रा.रायसिंगपुरा,नंदूरबार) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. बनछोड गेल्या सोमवारी (दि.१५) कामानिमित्त शहरात आले होते. सायंकाळच्या सुमारास परतीच्या प्रवासासाठी ते जुने सीबीएस बसस्थानकात गेले असता ही घटना घडली. नंदूरबार बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचा मोबाईल हातोहात लांबविला. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.
.
महिलेच्या गळयातील मंगळसूत्र चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथील खोलेमळा फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाया बाळासाहेब नवले (रा.आडकेनगर,जयभवानीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. नवले सोमवारी (दि.१५) सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. खोलेमळा भागातून शतपावली करून त्या आपल्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. श्याम खोले यांच्या बंगल्यासमोरून त्या रस्त्याने पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ््यातील सुमरे ५१ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.