सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने १२ वी यादी प्रसिध्द केली असून त्यात सातारा लोकसभा मतदार संघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चौथ्या यादीत ८ उमेदवारांची नावे असून त्यात राज्यातील छत्रपती उदयनराजे भोसले यांचे एकमेव नाव आहे. उत्तर प्रदेशमधील २, पश्चिम बंगालमधील १ व पंजाबमधील ४ नावांचा या यादीत समावेश आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने शशिकांत शिंदे यांची उमेदवारी घोषीत केली. त्यानंतर सोमवारी त्यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. पण, महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होत नसल्यामुळे येथे नाराजी होती. त्यानंतर आज भाजपने उमेदवारांची घोषणा केली. त्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांना दुस-यांदा संधी देण्यात आली.
२०१९ मध्ये या मतदार संघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीने पराभव केला होता. या मतदार संघात शरद पवार यांनी भर पावसात घेतलेली सभाही गाजली होती. त्यानंतर छत्रपती उद्यनराजेंची राज्यसभेवर भाजपने वर्णी लावली. त्यांचे राज्यसभेतील अजून काही वर्षे शिल्लक असतांना त्यांना लोकसभेत उतरवले आहे. कोल्हापूर येथे काँग्रेसने शाहु महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली. तर भाजपने साता-यांतून छत्रपती उद्यनराजे भोसले यांना संधी दिली. त्यामुळे महाविकास आघाडी व महायुतीने छत्रपती घराण्याचा मान या निवडणुकीत मान दिला आहे.