नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भविष्यकालीन पाणी कमतरता लक्षात घेता जिल्ह्यातील विविध लहान मोठ्या जलाशयात साचलेला गाळ काढून त्या ठिकाणी जलसंचय वाढविणे तसेच काढलेला गाळ आसपासच्या शेत जमिनीवर पसरवून जमिनीचा पोत सुधारणे व एकंदरीत जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार अंतर्गत जलसमृद्ध नाशिक अभियान नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली लोकसहभागातून १६ एप्रिल पासून सुरू होत आहे. सदरील अभियानास भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाऊंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे पाठबळ लाभले आहे. हे अभिनयान १६ एप्रिल ते १५ जून कालावधीत असणार आहे. यातून १९१ तलावातील गाळ काढला जाणार आहे. त्यासाठी ३ कोटी ३७ लाख खर्च येणार आहे.
जलसमृद्ध नाशिक अभियानांतर्गत नाशिकच्या सर्व स्वयंसेवी, बांधकाम, औद्योगिक, व्यापारी, सामाजिक, धार्मिक, व्यावसायिक संघटना व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून समृद्ध नाशिक फाऊंडेशन स्थापित करण्यात आले आहे फाऊंडेशनच्या मार्फत प्रसार माध्यमांच्या सहकार्याने व जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने गंगापूर धरणातील गाळ काढण्याचा कामापासून सदरील अभियानाचा शुभारंभ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगर पालिका आयुक्त डॉ अशोक करंजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आशिमा मित्तल, पोलीस आयुक्त डॉ संदीप कर्णिक, पोलीस अधिक्षक ग्रामीण पोलीस विक्रम देशमाने, मुख्य अभियंता उत्तर महाराष्ट्र प्रकाश मिसाळ, अधिक्षक अभियंता महेंद्र आमले, अधिक्षक अभियंता मृद व जलसंधारण हरिभाऊ गीते, कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे सोनल शहाणे या मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ वाजता गंगाव-हे गांवाजवळ, सोमा वाईनच्या पुढे या ठिकाणी होत आहे.
धरणातील गाळ यंत्रांच्या साह्याने काढून परिसरातील शेतकऱ्यांनी आणलेल्या ट्रॅक्टर किंवा टिप्पर मध्ये टाकून देण्याची जबाबदारी व खर्च अभियान उचलणार असून हा सुपिक गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ वाहून न्यावयाचा आहे. धरणातील सुपीक गाळ शेत जमिनीचा पोत सुधारण्यास व त्यायोगे उत्पादनक्षमता वाढविण्यास तसेच जमिनीचा उंच सकल भराव करण्यास अत्यंत उपयोगी आहे.
वर्षानुवर्षांपासून साठलेला धरणातील गाळ अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर काढल्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जलाशयातील पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ होणार आहे आणि त्यामुळे पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या पाण्याची तजवीज होणार असून भविष्यकालीन पाणी संकटावर मात करता येणार आहे.
पाणी प्रश्न हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असून येणारे दोन महिने आपल्या सर्वांसाठी संधीचे सोन्यात रूपांतर करण्याचे आहे. भविष्यात बंगलुरु शहरासारखी पाणी समस्या नाशिकमध्ये भेडसावू नये यासाठी सर्व नाशिक प्रेमी नागरिकांच्या तन-मन-धनाच्या सहभागातून हे अभियान पुढे न्यायचे आहे.
ह्या महत्वपूर्ण व जिव्हाळ्याच्या अभियानात नाशिककर नागरिकांनी / संस्थांनी सक्रीय सहभागी व्हावे तसेच मंगळवार दि १६ एप्रिल २०२४ सकाळी ८ वा गंगाव-हे येथे उपस्थित रहावे असे आवाहन समृद्ध नाशिक फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.