नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर विजय करंजकर हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ठाकरे गटाला त्यांची नाराजी दूर करण्यात अद्याप यश आलेले नाही. सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिल्याने करंजकर नाराज आहेत. त्यांना दुसऱ्यांना ‘मातोश्री’वरून बोलावणे येऊनदेखील त्यांनी पाठ फिरवली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख असलेले करंजकर नाराज झाल्यानंतर त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे ठाकरे यांनी सांगितले होते. याआधी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावूनदेखील करंजकर गेले नव्हते. त्यांना दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वर येण्याचे निमंत्रित देण्यात आले. मात्र या वेळीदेखील त्यांनी मातोश्रीवर जाण्याचे टाळले.
त्यामुळे शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरु झाली आहे. महायुतीत नाशिकची जागा ही शिंदे गटाला जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी विद्यमान हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. त्यामुळे या जागेसाठी करंजकर शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.