नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून एकाने तरूणीला आठ लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आली आहे. या फसवणूक प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदाशिव बैजनाथ कदम (२९ रा.पोन्ना तेलंगणा) असे तरूणीस गंडविणा-या ठकबाजाचे नाव आहे. याबाबत जेलरोड भागातील २३ वर्षीय नोकरदार तरूणीने फिर्याद दाखल केली आहे. संशयित आणि तरूणीमध्ये गेल्या डिसेंबर महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरपीएफमध्ये अधिकारी पदावर असल्याचे भासविल्याने दोघांमध्ये मैत्री झाली. याकाळात भामट्याने मुलीस थेट लग्नाची मागणी घातल्याने दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
संशयितने लग्नाचे आमिष दाखविल्याने युवतीचा त्याच्यावर विश्वास बसला. अवघ्या काही महिन्यातच त्याने या ना कारणाने तसेच आर्थिक चणचण असल्याची बतावणी करून युवतीकडून तब्बल आठ लाख रूपये उकळले. पैसे पदरात पडताच संशयिताने संपर्क तोडल्याने युवतीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.