सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने थेट ठाकरे गटाच्या उमदेवाराला विरोध करत बंडाचे निशाण फडकवलेलेल असतांना दुसरीकडे भाजमध्येही नाराजी नाट्य सुरु आहे. प्रचाराच्या एका बैठकीत सांगतील भाजपच्या माजी आमदाराने पक्षालाच खडेबोल सुनावले असून त्याची चर्चाही सध्या रंगली आहे. या नेत्याने थेट काँग्रेससारखी भाजपची अवस्था व्हायला वेळ लागणार नाही असे सांगत घरचा आहेर दिला आहे.
सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पलूस येथे आयोजित बैठकीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले की, लोकसभेसाठी मी उमेदवारीची मागणी केली होती. उमेदवारी द्यायची नव्हती, तर आम्हाला बोलवून तसे सांगायला हवे होते. उमेदवारी न देण्याचे कारण सांगायला हवे होते. आम्हाला काहीच अडचण नव्हती. पक्षावर आमचा राग नाही. पण विश्वासात घेऊन काम नाही केले नाही, तर काँग्रेससारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही. हा इशारा त्यांनी पक्षाला आणि मंत्री सुरेश खाडे यांच्यासह अन्य नेत्यांना दिला.
या वेळी देशमुख यांनी खा. संजयकाका पाटील यांच्यावरही टीका केली. आमचा कार्यक्रम करून परत निवडणुकीला उभे राहणार आणि आम्ही पक्ष म्हणून मत देणार. आता परत पाच वर्षे तेच करणार असाल, तर आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल.
पृथ्वीराज देशमुख हे माजी आमदार आणि सांगलीचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. देशमुख लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्याने भाजपत नाराजी आहे. काँग्रेस पाठोपाठ भाजपमध्येही हे नाराजी नाट्य सुरु असल्यामुळे त्याचा फायदा कोणाला मिळतो हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.