बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले भाऊ – बहिण यावेळेस एकत्र आल्यामुळे बीडचे चित्र वेगळे आहे. ताईसाठी भाऊ धनजंय मुंडे यांनी महायुतीच्या घटक पक्षाची बैठक घेतली. त्यावेळेस त्यांनी पंकजा मुंडेंचा यंदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय नोंदवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
शुक्रवारी महायुतीच्या सर्वच आमदार, माजी आमदार आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह शिवसेना आणि इतर मित्र पक्षाचे सर्वच मोठे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी धनंजय म्हणाले, की विरोधात लढलेले सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने पंकजा ऐतिहासिक मतांनी विजयी होतील.
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांमध्येच लढत होत होती. आता राष्ट्रवादी भाजपसोबत आल्याने महायुतीची ताकद वाढली आहे. महायुतीची ऐतिहासिक अशी एकजूट झाली असून शिवसेना आणि मनसेसह अनेक मित्रपक्ष आमच्या सोबत असल्यामुळे पंकजा यांचा विजय निश्चित असल्याचे धनजंय मुंडे यांनी सांगितले.