पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या १० वर्षात केलेली कामे आणि राज्य शासनाने केलेली कामे मतदारांपर्यंत पोहचवली, त्यांच्याशी नीट संवाद ठेवला तर ते नक्की आपल्याला मत देतील असे अधोरेखित केले. प्रत्येक बूथ महत्वाचा असून विजय मिळवण्यासाठी प्रत्येक बूथ जिंकावे लागेल. लोकसभा निवडणुकीसाठी ४५ हून अधिक जागा जिंकायच्या असून पुणे जिल्ह्यातील चारही जागा जिंकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, मुरलीधर मोहोळ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अजय भोसले, युवासेनेचे किरण साळी तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यावेळी पुण्यात एक धागा प्रभू श्रीरामांसाठी असे अभियान राबवले गेले. आता असेच मतांची वीण वाढवून दिल्लीत आपला उमेदवार पाठवायचा असल्याचे यावेळी नमूद केले. आता भाऊ तात्या नव्हे तर मुरलीअण्णाच निवडून येणार असेही आवर्जून सांगितले.
शिवसेना आणि भाजपची युती २५-३० वर्षे जुनी आहे, त्यात आता अजितदादांची राष्ट्रवादी सहभागी झाली आहे. आपण सर्वांनी मिळून महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.