इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोला लोकसभा मतदार संघात वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले आहे. वंचितने गॅस सिलेंडर पहिली पसंती व तिस-या पसंतीचे रोड रोलर चिन्हाची मागणी केली होती. पण, दुस-या पसंतीचे प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले आहे.
अकोल्यात तिरंगी लढत होणार असून काँग्रेसकडून डॅा. अभय पाटील, भाजपकडून अनूप धोत्रे व वंचितचे प्रकाश आंबेडकर हे उमेदवार रिंगणात आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांचे नाव महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत चर्चेत होते. पण, महाविकास आघाडीची चर्चा फिसकल्यानंतर त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीचे गणित बिघडणार आहे.
या निवडणुकीत वंचितने काही ठिकाणी काँग्रेसला तर काही ठिकाणी राष्ट्रवादीला पाठींबा दिला आहे. त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. तरी पण, काही ठिकाणी वंचितचे उमेदवार असल्यामुळे निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीचे प्रेशर वंचितने वाढवले आहे. त्यामुळे त्यांच्या कुकरमधून आता काय शिट्या बाहेर पडतात हे प्रचारात दिसणार आहे.