दीपक ओढेकर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार
गेली सुमारे २० वर्षे ज्या एका स्वप्नासाठी आणि ध्येयासाठी म्हणजेच जागतिक विजेतेपदाची लढत खेळण्यासाठी-नाशिकचा ग्रॅण्डमास्टर विदित संतोष गुजराथी रात्रीचा दिवस करुन अक्षरशः प्रचंड कष्ट आणि मेहनत करीत आहे त्या दिवसाची पहाट आता त्याच्या आयुष्यात उगवत आहे असे म्हणायला हरकत नाही !
आजपासून कॅनडातील टोरोंटो येथे जागतिक विजेतेपदासाठी असलेली सेमी फायनल म्हणजेच जगातील अव्वल आठ खेळाडूत होणारी कॅंडीडेट्स स्पर्धा सुरु होत आहे ज्यात प्रथमच तीन भारतीय पुरुष खेळाडू – प्रद्न्यानानंद , गुकेश आणि नाशिकचा विदित गुजराथी – खेळणार आहेत . त्यामुळे नाशिकच्या आणि महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे !
इतर पाच खेळाडू आहेत अमेरिकेचे करुआना ( जागतिक रेटिंग २८०३ ) आणि हिकारु नाकामुरा (२७८९),फ्रान्सचा अलिरझा फिरौझा (२७६०), रशियाचा आयन नेपोम्नियाची (२७५८) आणि सगळ्यात दुबळा मानलेला खेळाडू अझरबैजानचा निजात अबासोव ( २६३२). हे आठ खेळाडू एकमेकांशी दोनदा म्हणजेच प्रत्येक जण एकूण १४ सामने एप्रिल ४ ते २२ या दरम्यान खेळणार आहे आणि.यातील विजेता हा मागील विश्वविजेत्या बरोबर म्हणजेच चीनच्या डिंग लिरेनशी अंतिम लढत म्हणजेच विश्वविजेतेपदाची लढत पुढील काही महिन्यात खेळेल !
जवळपास सर्व बुद्धिबळ तज्ज्ञ म्हणतात की करुआना किंवा नाकामुरा हेच विजेते होणार कारण त्यांचा खेळ आणि अशा दर्जाच्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव दांडगा आहे. आणि ते नाही जिंकले तर मागील विश्वविजेतेपद स्पर्धेतील उपविजेता आयन नेपोम्नियाची याच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडणार ! गंमत म्हणजे या आठमधील सर्वात दुबळा असलेल्या निजात अबासोवला दोनदा पराभूत करून हक्काचे दोन गुण मिळवले तर काम सोपे होऊ शकते असे सर्व जण मानत आहेत !
आता कॅंडीडेट्स स्पर्धेत जगातील अव्वल आठच खेळाडू खेळत असल्याने विदितच्या विजयाची शक्यता किती? तर जगातील बुद्धिबळ तज्ज्ञ म्हणतात फक्त ४% तर कार्लसन म्हणतो की ,” I will be shocked if any among the three Indians win .” काहींनी तर तीनही भारतीय खेळाडू मिळून फक्त १८% जिंकण्याची शक्यता व्यक्त केली आहे .
पण अशाही परिस्थितीत आशा सोडता येत नाही आणि खेळ म्हंटले की काहीही होऊ शकते हे स्विकारून प्रत्येक खेळाडू पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहेत . विदित गेली ३/४ महिने आपल्या ४ आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ज्ञ चमूसह ( ज्यांना सेकंड्स म्हंटले जाते आणि त्यांचे नाव इतर खेळाडूना समजू नये म्हणून गुप्त ठेवले जाते ) खेळाची सर्व तांत्रिक अंगे तसेच इतर सात खेळाडूंच्या खेळाची बलस्थाने आणि कच्चे दुवे यांचा अभ्यास करून मैदानात उतरत आहे . तसेच शारीरिक तंदुरुस्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या Trainers बरोबर मेहनत घेत होता. मानसिक आरोग्य सुदृढ राहवे म्हणून क्रीडा मानसशास्त्रज्ञ आणि ओम स्वामी या गुरुंच्या मार्गदर्शना खाली योग आणि ध्यानधारणा करीत होता. ही सर्व तज्ज्ञ मंडळी विदितच्या घरीच गेली अनेक दिवस राहुन त्याची जय्यत तयारी करून घेत होती !
गेल्या दोन वर्षातील विदितचे बदललेले सकारात्मक रूप आणि त्याचे परिपक्व वय या गोष्टी नजरेआड करून चालणार नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्याने ग्रांड स्विस स्पर्धेतील पहिला सामना गमावूनही मिळविलेले विजेतेपद ! कॅंडीडेट्स जिंकण्यासाठी विदीत कोणतीही कसर सोडायला तयार नाही कारण वरील तयारी शिवाय तो त्याचा मोठा मानसिक आधार असलेल्या आपल्या धाकट्या बहिणीला (वेदिका ) बरोबर घेउन गेला आहे . ती त्याची Lucky Charm तर आहेच पण त्याला हवे ते खाऊ घालणे आणि मनस्थिती ठीक नसेल तरी खायला भाग पाडणे ही मह्त्वपूर्ण जबाबदारी वेदिकाने घेतली आहे !
इतका प्रचंड खर्च विदित आणि त्याचे कुटुंबीय स्वतःच्या खिशातून तसेच काही मोजक्या स्पॉंसर्स च्या मदतीने करीत आहे . या वरुन कॅंडीडेट्स स्पर्धेचे अनन्यसाधारण महत्त्व समजावे. भारतीय बुद्धिबळ संघटनेनेही या तीन भारतीय खेळाडू तसेच कोनेरू हंपी आणि आर वैशाली या महिला कॅंडीडेट्स मध्ये भारतीय प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूसह पाच जणाना आर्थिक मदत देऊ केली आहे. एकंदरीत आता ही आरपारची लढाई जिंकायचा पण केलेल्या विदितला नशीबाने साथ द्यावी अशीच प्रार्थना प्रत्येक नाशिककर करेल !
deepakodhekar@gmail.com