नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरघोस कमाईचे आमिष दाखवत भामट्यांनी खासगी नोकरी करणा-या एका महिलेस १ लाख ६५ हजारास ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध कारणांच्या बहाण्याने ही रक्कम उकळण्यात आली असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विमल अमोल हुदलीकर (रा.सिडको) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. हुदलीकर या काठेगल्ली भागातील एका बांधकाम व्यावसायीक कार्यालयात नोकरीस आहेत. २४ मार्च रोजी सायबर भामट्यांनी त्यांच्याशी टेलीग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला होता. वर्किंग कोड आणि जनरेट आयडीवर संपर्क साधत त्यांना अल्पावधीत भरघोस कमाईचे आमिष दाखविण्यात आले होते.
हुदलीकर यांचा विश्वास संपादन करीत भामट्यांनी त्याना वेगवेगळया कंपनीचे टास्क देवून तसेच विविध कारणांच्या बहाण्याने त्यांना १ लाख ६५ हजार रूपयांची गुंतवणुक करण्यास भाग पाडले. गुंतवणुकीसह मोबदला न मिळाल्याने हुदलीकर यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक नरूटे करीत आहेत.