नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या उमेदवारीला सर्व स्तरातून पाठींबा मिळत आहे. अशात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात भगरे यांचे कौतुक करुन त्यांनी शरद पवारांच्या उमेदवारांची निवडणूक आता ही पक्षाची निवडणूक राहिली नसून ती सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक झाल्याचे म्हटले आहे
या पोस्टमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे, आईचे आशीर्वाद घेताना दिसणारी व्यक्ती आहे, ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून दिंडोरी लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे ते भास्कर भगरे सर म्हणून शिक्षक आणि पालकांत प्रसिद्ध आहेत. सध्या ते पिंपळगाव बसमत येथील कन्या शाळेत शिक्षक आहेत. फोटो निरखून पाहिला तर त्यांच्या घरातील परिस्थिती सहज लक्षात येईल.
उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज वणी येथे इंडिया आघाडीची पहिली बैठक ठेवलेली. या बैठकीला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. समोरील उमेदवार पैशाने मजबूत असल्याने आजच्या बैठकीला आलेल्या अनेकांनी स्वतः पुढाकार घेऊन ५००, १०००, २००० अशी शक्य ती रक्कम लोकवर्गणी गोळा करून त्यांना दिली. बैठक संपल्यावर त्या जमा झालेल्या लोकवर्गणीची रक्कम मोजली तर दहा लाखाच्यावर झाली होती, हा आकडा हळू हळू वाढत आहे.
या उदाहरणा वरून लक्षात येते की शरद पवारांच्या उमेदवारांची निवडणूक आता ही पक्षाची निवडणूक राहिली नसून ती सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली निवडणूक झाली आहे. प्रत्येकजण आपल्या पटीने जमेल ती मदत साहेबांना करत आहे. भगरे सर यांच्या सारखा प्रामाणिक शिक्षक लोकसभेत दिसायलाच हवा, अशी लोकांत जनभावना बळावत आहे. त्यामुळे धनाढ्य व्यक्तीला पाडून बदल झाला तर लोकांना आश्चर्य वाटणार नाही..