इंडिया दर्पण वृत्तसेवा
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात सिराज याने एकाच षटकात चार विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले आहे. त्याच्या या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. त्याने श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. त्याच्या या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे.
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताच्या जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेरा याला पहिल्याच षटकात आऊट केले. त्यानंतर मोहम्मद सिराज कमाल केली. मोहम्मद सिराज त्याचे दुसरे षटक टाकण्यासाठी आला. त्याने यावेळी पहिल्याच चेंडूवर पथुम निसांका याला दोन धावांवर रविंद्र जाडेजा याच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिराजने सदीरा समरविक्रमा याला शून्यावर तंबूत धाडले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चरिथ असलंका यालाही सिराजने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद केले.
लागोपाठ दोन विकेट घेतल्यानंतर सिराज हॅट्ट्रिकवर होता. पण पाचव्या चेंडूवर सिराजला चौकार ठोकला. पण सहाव्या चेंडूवर सिराजने पुन्हा विकेट घेतली. सिराजने धनंजय डी सिल्वा याला ४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे सिराजने अवघ्या १ षटकात ४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्यानंतरही सिराजने दोन विकेट आणखी घेतल्या.