इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात एकीकडे ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केला असला तरी अजूनही महायुतीचा तिढा मात्र काही सुटत नाही. या मतदार संघात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकीकडे दावा केला असल्यामुळे या जागेची राज्यभर चर्चा आहे. शिवसेना शिंदेगटाला ही जागा मिळेल असे जवळपास निश्चित असतांना अगोदर भाजपने दावा केला. ही चर्चा सुरु असतांनाच मध्येच मनसेचे नाव आले. त्यानंतर आता राष्ट्रवादीने येथे दावा ठोकल्यामुळे या जागेचा तिढा वाढला आहे. या जागेवर इतका संघर्ष करण्याची वेळ का यावी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
खरं तर महायुतीमध्ये ज्यांचे विद्यमान खासदार आहे तेथे त्या पक्षाला संधी मिळेल असे ठरलेले असतांना नाशिकच्या जागेचा तिढा का वाढला हा प्रश्न आहे. मुळात महायुतीमध्ये असलेले हे तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर एक नाही. राज्यात युती झाली म्हणून त्यांना एकत्र यावे लागले आहे. त्यात तिकीट कोणाला मिळाले तर ते मनापासून काम करेल याची शाश्वती नाही. पण, महायुतीचा उमेदवार निवडणून आणण्यासाठी त्यांना काम करावे लागणार आहे.
लोकसभेतच या तिन्ही पक्षात एकमत नाही. त्यामुळे आगामी विधानसभा व महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची काय स्थिती राहिल हे आता कोणालाही सांगता येणार नाही. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाची ताकद कमी झाली असली तरी त्यांनी उमेदवारी देतांना धाडस केले आहे. एेनवेळी त्यांनी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काहीसे नाराज झालेले विजय करंजकर पुन्हा जोमाने काम करेल की बंड करेल ही धाकधुक या पक्षाला सुध्दा आहे.
एकुणच नाशिकच्या लोकसभा जागेचा महायुतीचा तिढा एक दोन दिवसात सुटेल अशी आशा आपण करु या…पण, ही जागा कोणालाही मिळाली तरी ज्या पध्दतीने विद्यमान खासदारांना तिकीट मिळवण्यासाठी वारंवार मुंबईला जावून शक्ती प्रदर्शन करावे लागले. ते मात्र नाशिकला फारसे रुचणारे नाही. खरं तर येथे स्वाभिमानाचा प्रश्न आहे. ज्या पक्षासाठी आपण खस्ता खातो तेथेच त्यांना ताकद दाखवावी लागावी हे मात्र दुर्दैवी आहे. खरं तर ही महायुती आहे पण, येथे महाभीती वाटावी अशी स्थिती सर्वच घटक पक्षाची आहे. शिंदे गटाला उमेदवारी मिळाली तर तो नाशिकमध्ये प्रबळ होणार, भुजबळांना उमेदवारी दिली तर मराठा समाजाचा रोष येणार, भाजपला जागा दिली तर राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटाला पुढील निवडणुकीची चिंता आहे. त्यामुळे येथे युतीपेक्षा भीती जास्त आहे.