छत्रपती संभाजीनगरः शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी व्यक्त करतांना मी चंद्रकांत खैरे यांचे नव्हे, तर केवळ पक्षाचे काम करणार असे सांगत नाराजी व्यक्त केली.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दानवे म्हणाले, की गेल्या दहा वर्षांपासून लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो. उमेदवारीसाठी इच्छुक असण्यात वावगे नाही. मात्र मला विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आल्याने संपूर्ण राज्याची जबाबदारी माझ्यावर आहे. माझी इच्छा असताना मला उमेदवारी न मिळाल्याने थोडेफार वाईट वाटते, अशी खंत व्यक्त करून पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी पार पाडू. मी खैरे यांची नव्हे, तर माझ्या पक्षाचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दानवे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दानवे महायुती सोबत येणार असल्याचा दावा केला होता. परंतु त्यांनी आईचा दाखला देऊन पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले होते.