इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या १५-१६ जागांवरील उमेदवारांची नावाची निश्चिती झाली असून, मुखपत्रातून आज ही नावे जाहीर केली जाणार असल्याची माहिती खा. संजय राऊत यांनी दिली. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा कायम असताना ठाकरे गटाच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा होणार आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, खा. राऊत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.
मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत शरद पवार यांना शिवसेना ठाकरे गटाच्या १५ जागांवरील उमेदवारांची यादी दाखवली जाणार आहे. दरम्यान, खा. राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष नाही. तो कधीच मोठा पक्ष नव्हता. एखादा दरोडेखोर चोऱ्या-माऱ्या करून आपली संपत्ती वाढवतो आणि म्हणतो मी श्रीमंत आहे, तसे भाजपचे झाले आहे.