इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य सरकारने दहा टक्के मराठा आरक्षण देऊनही जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची अंमलबजावणी शासकीय स्तरावर होत नाही, याकरिता तात्काळ पाऊले उचलावीत अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे, सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना करणे आवश्यक आहे की या क्षणापासूनच सर्टिफिकेट वितरण संपूर्ण क्षमतेने केले पाहिजे. जे याबाबत कार्य करत नाहीत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसदी घ्यावी. उद्या पोलिस भरतीचा विषय देखील ऐरणीवर आला आहे. मराठा तरुणांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मुदतवाढ द्या, ही महत्त्वपूर्ण मागणी करतोय.
यानिमित्ताने एक आनंदाची बातमी मला सांगायची आहे, ती म्हणजे महावितरणच्या वतीने भरतीची जाहिरात करण्यात आली होती. आपल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मराठा उमेदवारांच्या भरतीत मराठा आरक्षण लागू केले काल मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आणि आपली मागणी पूर्ण झाली. सरकारने आपल्या जीआर मध्ये बदल करत याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रमाणपत्र काढण्यासाठी भरपूर वेळ आपल्याकडे उपलब्ध असून, या संधीचे सोने करावे, असे आवाहन करतो.
या भरती संदर्भात राज्य सरकारने आपल्या जीआर मध्ये बदल केले आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी, युवकांनी याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतो. सरकारला पुनश्च एकदा विनंती! पोलीस भरती संदर्भात आपण जातीच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत मुदतवाढ देण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती की, तात्काळ निर्णय घेऊन मराठा समाजातील तरुणांना याबाबतीत सहकार्य करावे.