इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली राऊस एव्हेन्यु कोर्टाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. मद्य धोरण प्रकरणी चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.
ईडीने १० दिवसाची कोठडी मागीतल होती. पण, कोर्टाने सहा दिवसाची कोठडी दिली. दरम्यान, ‘ईडी’ने केलेल्या अटकेविरोधात केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या कोर्टातून अर्ज माघारी घेण्यात आला. आता ट्रायल कोर्टमध्ये केजरीवाल आपला पक्ष ठेवणार आहे. सुप्रीम कोर्टाने जर निर्णय विरोधात दिला तर पुन्हा अपील कऱण्याची संधी मिळणार नाही. म्हणून केजरीवाल यांच्या लीगल टीमने एेनवेळी आपली रणनिती बदलल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर काही तासांतच त्यांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना पदावर असताना अटक होण्याची ही पहिलीच घटना आहे. चौकशीच्या निमित्ताने केजरीवाल यांना ‘ईडी’ अटक करण्याची भीती ‘आप’ व्यक्त करीत होता. केजरीवाल यांना अटक झाली असली, तरी ते दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील, असे ‘आप’ने म्हटले आहे.
दरम्यान, ‘आप’ने शुक्रवारी दिल्लीसह देशभर आंदोलन केले. गुरुवारी रात्रीही पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ‘आप’च्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. केजरीवाल यांच्या घराबाहेर ‘आप’चे नेतेही निदर्शने केली.