नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात ग्रामिण पोलीसांना यश आले आहे. कळवण तालुक्यातील अभोणा येथील गोळाखाल खूनाचा उलगडा झाला आहे. सुतावरून स्वर्ग गाठत पोलीसांनी ठाणे जिह्यातील वाहन खरेदी विक्री करणा-या दोघा व्यावसायीकांना बेड्या ठोकल्या असून, त्यानी अन्य साथीदारांच्या मदतीने मद्यपानासह महिलाच्या छेडखानीमुळे आपल्या भागीदाराची हत्या केली आहे.
शहानवाज उर्फ बबलू शोएब शेख (४६ रा.खालीदशेठ चाळ,भिवंडी जि.ठाणे) व सादिक इब्राहिम खान (४८ रा.वासरी टॉवर,सावरकरनगर मुंब्रा जि.ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या घटनेत शहारूख खान मेहबुब खान (मुळ रा.आझमगड उत्तरप्रदेश हल्ली वाशी नवी मुंबई) या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. कळवण तालूक्यातील अभोणा कनाशी मार्गावरील गोळाखाल शिवारातील एका पुलाखाली ८ मार्च रोजी अज्ञात पुरूषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. मारेक-यांनी मृताची ओळख पटू नये तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये अप्पर अधिक्षक आदित्य मिरखेलकर,कळवणचे उपनिभागीय अधिकारी किरण सुर्यवंशी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे तसेच अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक यशवंत शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली होती. तसेच घटनास्थळी फॉरेन्सीक टिम व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. मारेक-यांनी कुठलाही पुरावा न सोडल्याने ग्रामिण पोलीसांसमोर या खूनाचा उलगडा करण्याचे मोठे आवाहन निर्माण झाले होते.
या घटनेची दखल घेत एलसीबीची टिम सात दिवस कनाशी व अभोणा परिसरात तळ ठोकून होती. घटना घडली त्या दिवशी महाशिवरात्री रोजी जयदर ता. कळवण येथील प्रशिध्द सिध्देश्वर मंदिर परिसरात जत्रा भरलेली असल्याने या मार्गावर वर्दळ होती. सुतावरून स्वर्ग गाठत पथकांनी घटनास्थळासह परिसरातील गाव पाड्यांवर घेतलेल्या माहितीत काळ््या रंगाची चार चाकी या मार्गावरून गेल्याचे पुढे आल्याने पोलीसांनी त्या दिशेने आपल्या तपासाची दिशा निश्चीत केल्याने या गुह्याचा उलगडा झाला. भौतिक आणि तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे पोलीसांनी ठाणे जिह्यातील भिवंडी येथील काळ््या रंगाच्या इनोव्हा कार चालक व मालकाची माहिती मिळविली. त्यानुसार दोघांना बेड्या ठोकल्या असता चौकशीत वाहन खरेदी विक्री करणारे संशयित मृत भागीदारासह अन्य तीन साथीदारांना सोबत घेवून ८ मार्च रोजी वाहन खरेदीसाठी भिवंडी येथून मालेगाव येथे गेले होते. मृताच्या नावाचा उलगडा होताच पोलीसांनी नातेवाईकांच्या माध्यमातून त्याची ओळख पटविली.
मृत शहारूख खान या दारूचे व्यसन होते. तसेच त्यास महिलांशी छेडखानी करण्याचा नाद होता. मालेगाव येथे असाच प्रकार घडल्याने संशयितांनी त्यास मारहाण केली. या मारहाणीत तो बेशुध्द झाल्याने शाहरूखचा मयत झाल्याचे समजून संशयितांनी एमएच ०१ एई ०००८ या कारमधून त्यास गोळाखाल शिवारात आणले. याठिकाणी एका पुलाखाली त्यास पेट्रोल टाकून पेटवून देण्यात येवून पुरावा नष्ट करण्यात आल्याची दोघा संशयितांनी कबुली दिली आहे. मालेगाव येथील उर्वरीत संशयितांचा शोध सुरू असून कारसह संशयितांना अभोणा पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई एलसीबीचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे,उपनिरीक्षक संदिप पाटील हवालदार नवनाथ सानप,चेतन संवस्तरकर,पोलीस नाईक विश्वनाथ काकड,हेमंत गिलबिले,योगेश कोळी प्रदिप बहिरम व शरद मोगल आदींच्या पथकाने केली.